२८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:03+5:302021-06-17T04:28:03+5:30

वाशिम : कोरोनाकाळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू होणार आहेत. ...

School to open for teachers from June 28! | २८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा !

२८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा !

Next

वाशिम : कोरोनाकाळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू होणार आहेत. कोणत्या वर्गातील किती शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने १४ जूनला जारी केल्या आहेत.

वाशिमसह विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २७ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केली. त्यानुसार शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार नसली तरी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम, आदींसाठी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या. कोविड-१९ परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता सर्व शाळा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या.

.....................

बॉक्स

अशी राहील शिक्षकांची उपस्थिती

१) इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे ५० टक्के, तसेच दहावी व बारावीचे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.

२) शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.

३) प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित अनिवार्य आहे.

४) इयत्ता दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून, मर्यादित वेळेत हा निकाल घोषित करावयाचा असल्याने दहावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.

.....

कोट बॉक्स

२८ जूनपासून जिल्ह्यातील शाळा शिक्षकांसाठी सुरू होणार आहेत. कोणत्या वर्गातील किती शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- आकाश आहाळे

उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

०००

Web Title: School to open for teachers from June 28!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.