शाळा, महाविद्यालये, ब्युटीपार्लर केशकर्तनालये राहणार बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:49 AM2020-06-01T10:49:36+5:302020-06-01T10:49:45+5:30

सर्व दुकाने सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे

 Schools, colleges, beauty parlors and hairdressers will remain closed! | शाळा, महाविद्यालये, ब्युटीपार्लर केशकर्तनालये राहणार बंदच!

शाळा, महाविद्यालये, ब्युटीपार्लर केशकर्तनालये राहणार बंदच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ३० जून २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून याबाबतची सुधारित नियमावली १ जून २०२० पासून लागू करण्यात येत आहे. तथापि, जिल्ह्यात यापूर्वी प्रमाणेच सर्व दुकाने सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे; मात्र फिजीकल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा कुठेही गर्दी आढळून आल्यास आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले.
नवीन नियमावलीनुसार केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लागू राहणार असून याकालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई राहील. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्री, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या काळात सुरू ठेवण्यास मुभा राहील. तसेच बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहील. नगरपरिषद क्षेत्राबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरु राहतील. नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोलपंप सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहतील.
जिल्ह्यात सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील. शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा, सिनेमागृह, जिम्नॅशियम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थियटर, बार आणि आॅडिटोरीयम, असेम्ब्ली हॉल सारखी ठिकाणे बंद राहतील. विशेष परवानगीशिवाय रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक बंद राहील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, अ‍ॅकॅडमीक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी राहणार आहे. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत. दारूची दुकाने सुरु ठेवण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क शाखेमार्फत ५ मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही कायम राहतील.
क्रीडा संकुलाचा बाह्य परिसर, मैदाने नागरिकांना व्यायामासाठी खुली राहतील. मात्र, याठिकाणी सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी फिजीकल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. इनडोअर क्रीडा संकुल बंद राहतील. सर्व प्रकारची मालवाहतूक सुरु राहील; मात्र राज्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक संनियंत्रित राहील. अशा प्रवासासाठी यापूर्वीप्रमाणे ई-पासची सुविधा सुरु राहणार आहे.

Web Title:  Schools, colleges, beauty parlors and hairdressers will remain closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम