वाशिम जिल्ह्यातील शाळा सुरू ; महाविद्यालये मात्र बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:34 AM2021-02-02T11:34:46+5:302021-02-02T11:35:44+5:30
Washim collages News महाविद्यालये सुरू केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असताना, दुसरीकडे महाविद्यालये मात्र बंदच आहेत. महाविद्यालये सुरू केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे.
सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षणक्षेत्रही सुटू शकले नाही. नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता नववी ते बारावीच्या शाळेची पहिली घंटा वाजली. त्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. दुसरीकडे, महाविद्यालये अद्याप सुरू झाले नाहीत. इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, असे असतानाही नेमकी महाविद्यालयेच बंद का? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
गेल्या १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे महाविद्यालये सुरू होणे अपेक्षित आहे. महाविद्यालये सुरू केव्हा होणार याकडे लक्ष लागून आहे.
-सुरज सरकटे, विद्यार्थीवाशिम