लोकमत न्युज नेटवर्क राजुरा (वाशिम) : खरीप पेरणी तोंडावर असतांना शेतकरी वर्ग बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी आर्थिक जुळवा जुळव करण्यात गुंतला आहे, मात्र गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे.गत वर्षी खरीप पिकावर किडीचा प्रादूर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देतांना बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, उडीद, मुग, आदि पिकांची मोठी हानी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला मोड फुटले. ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊन संचारबंदीचा फटका भाजीपाला, फळ, उत्पादकांना बसला. थकबाकीदार शेतकºयांच्या पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम असल्याने खरिपाचे पीककर्ज वाटप अद्यापही प्रलंबीत आहे. परिणामी शेतकºयाना खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यात अनुदानावर खते, बियाणे मिळण्याची आशा धुसर दिसत असताना बियाणे दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणे विविध वानाची बॅग, १ हजार ७०० रुपये ते १ हजार ९०० पन्नास रुपयांपर्यंत भाव होते तर या वर्षी २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपये प्रती बॅगेचे दर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी उडीद, मूग, बियाणे प्रती किलो १२० रुपये होते, यंदा मात्र हे बियाणे प्रति किलो १८० रुपयांपर्यंत वाढले आहे, तर तुरीच्या बियाण्यात सुध्दा १० ते २० रुपये प्रती किलो भाववाढ झाल्याचे समजते.
दरवर्षी उदभवणाºया अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकºयांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच यावर्षी बियाणे दरवाढीचे संकट शेतकºयासमोर उभे ठाकल्याने शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. - अनिल अहाळे,शेतकरी, राजुरा
ओल्या दुष्काळाने खरीपातील सोयाबीन पावसात भिजले त्यामुळे, कंपन्यामध्ये अपेक्षीत बियाणे उत्पादन होऊ शकले नाही यावर्षी सोयाबीन बियाणे दरात मोठी वाढ झाली.कैलास भांडेकर, संचालक, माऊली कृषी सेवा केंद्र, मालेगाव