मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाऊंडेशन ही संघटना जैवविविधतेचे महत्त्व जनतेला पटवून देतानाच वन्यजिवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य गेल्या सहा वर्षांपासून करीत आहे. या संघटनेच्या सदस्यांनी आजवर रस्ता अपघातासह, कुत्र्यांच्या हल्ल्यात, विहिरीत पडल्याने किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यजिवांवरही त्यांनी उपचार करून कित्येक वन्यप्राण्यांना जीवदानही दिले आहे. शिवाय, हजारो सापांना जीवदान देतानाच मानव-साप संघर्षावर प्रभावी नियंत्रण मिळविले आहे. त्यात रविवार, दि. १४ मार्च रोजी मानोरा तालुक्यातील चाकूर, कोलार, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा, गोगरी, येडशी आणि शहापूर येथे आढळून आलेल्या एकूण ८ सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. त्यात चार नागांसह एक कुकरी, एक कवड्या, एक रुखई आणि गवत्या जातीच्या एका सापाचा समावेश होता. संघटनेच्या मंगरुळपीर शाखेचे सुबोध साठे, शुभम ठाकूर, गणेश गोरले, उल्हास मांढरे, कोलार शाखेचे सदस्य राम अंबोरे, विठोबा आडे, वनोजा शाखेचे सदस्य सतीश गावंडे, शुभम हेकड, अमर खडसे, सौरव इंगोले, उमेश जंगले, आदित्य इंगोले, वैभव गावंडे, राहुल राठोड, सतीश गावंडे आदींनी पयावर्रण अभ्यासक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात हे साप पकडले.
--------------
४२ दिवसांत पकडले ४९ साप
निसर्ग स्पर्श फाऊंडेशन संघटनेच्या सदस्यांनी ग्रामीण आणि शहरी भागांतील शाळा, महाविद्यालयात गतवर्षापर्यंत शिक्षक, विद्यार्थ्यांन सापांची माहिती देतानाच जैवविविधतेत सापांचे असलेले महत्त्वही पटवून दिले. आजवरच्या सहा वर्षांत संघटनेने हजारो साप पकडले आहेत. त्यात मण्यार, घोणस, नाग या जहाल विषारी सापांसह विविध प्रकारच्या निमविषारी आणि बिनविषारी सापांचाही समावेश होता. या संघटनेने १ फेबु्रवारी ते १४ मार्च या ४२ दिवसांच्या कालावधीतच ४९ साप पकडून त्यांना जीवदान देण्याची किमया साधली आहे.