कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने शिरपूरकर चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:38 AM2021-04-26T04:38:07+5:302021-04-26T04:38:07+5:30
शिरपूर येथे हळूहळू बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच मागील आठ ते दहा दिवसांत पाचजणांचा मृत्यू झाल्याची सरकारी माहिती ...
शिरपूर येथे हळूहळू बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच मागील आठ ते दहा दिवसांत पाचजणांचा मृत्यू झाल्याची सरकारी माहिती आहे. मृतकांमध्ये तीनजण पन्नास वर्ष वयोगटाचे आहेत, तर दोन ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. गावात ८५ हून अधिकजण कोरोनाबाधित असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळाली आहे. नजीकच्या खंडाळा शिंदे गावातील १० ते १२ दिवसांत आठ ते नऊ मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, त्या गावात अपेक्षित कोरोना तपासणी होत नसल्याने व खंडाळा येथील लोकांचा शिरपूर येथे नेहमीच वावर असल्याने शिरपूरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. शिरपूर बसस्थानक परिसरात व बाजारपेठेत सकाळी अकरा वाजेपर्यंत होणाऱ्या गर्दीस आवर घालणेसुद्धा गरजेचे आहे, अन्यथा पुढील काळात दाट लोकवस्ती असलेल्या शिरपूर गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मागील आठ दिवसांत झालेल्या पाचजणांचा मृत्यूमुळे शिरपूरकरांची चिंता वाढली आहे. काहीजणांचा मृत्यू घरी झाल्याने ती आकडेवारी यामध्ये समाविष्ट नाही.