लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व अन्य काही संघटनांनी २९ जानेवारी रोजी पुकारलेल्या बंददरम्यान रिसोड व कारंजा शहरात दगडफेक करणाºयांची धरपकड सुरूच आहे. ३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. सुधारीत नागरिकत्व कायदा हा संविधानविरोधी असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा व अन्य काही संघटनांनी २९ जानेवारी रोजी रिसोड व कारंजा शहरात बंद पुकारला होता. मोर्चादरम्यान कारंजा व रिसोड शहरात दुकानांवर तसेच वाहनांवर दगडफेक झाल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणात सहभाग असणाºयांची धरपकड सुरू झाली असून, ३० जानेवारी रोजी रिसोड येथे ८ तर कारंजा येथे १३ जणांना अटक केली होती. ३१ जानेवारी रोजी रिसोड शहरातून आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रिसोड येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींची एकूण संख्या आता १० झाली असून, यामध्ये चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. कारंजा व रिसोड शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रिसोड शहरात एकूण १४ ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला असून तीन पेट्रोलिंग वाहने कार्यरत आहेत.
रिसोड, कारंजात शांतता; आरोपींची धरपकड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 4:30 PM