......................
जिल्हा कचेरीत पाण्याचा अभाव
वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासह वापरावयाचे पाणीही उपलब्ध नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहांमध्ये यामुळे घाण पसरत असल्याचे दिसून येत आहे.
...............
पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
वाशिम : तहसील कार्यालय, पंचायत समिती यासह इतर शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असे असताना पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. ही व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे गणेश आढाव यांनी बुधवारी निवेदनाव्दारे केली.
..............
सोयाबीनला ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर
किन्हीराजा : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सध्या ४००० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे.
..............
घरकुलांची कामे मार्गी लागणार
वाशिम : काही लाभार्थींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने कारंजा तालुक्यातील २०८ घरकुलांची कामे प्रलंबित राहिली आहेत. ही कामे आता मार्गी लागणार असल्याची माहिती पंचायत समितीकडून बुधवारी प्राप्त झाली.
.................
कलावंतांकडून समाजप्रबोधन
मेडशी : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजप्रबोधनाचे सर्वच कार्यक्रम थांबले होते. यामुळे रानोमाळ भटकून पोटाची खळगी भरणाऱ्या कलावंतांवरही उपासमारीची वेळ ओढवली होती. आता कार्यक्रम सुरू झाले असून, मेडशी येथे गुरुवारी कलावंतांनी कार्यक्रम सादर केला.
..............
प्रवाशांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन
मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळला नसताना खासगी वाहनांव्दारे ग्रामीण भागात प्रवास करणारे प्रवाशी बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून प्रवाशांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
.............
कंत्राटी कामगारांचा प्रश्न निघाला निकाली
वाशिम : महावितरणमध्ये कंत्राटी तत्त्वावर कामे करणाऱ्या कामगारांनी मध्यंतरी संबंधित एजन्सीच्या चुकीच्या धोरणांप्रति ‘एल्गार’ पुकारत आंदोलन केले होते. हा प्रश्न तूर्तास निकाली निघाल्याची माहिती तांत्रिक अॅप्रेंटीस संघटनेचे प्रभाकर लहाने यांनी गुरुवारी दिली.
...............
आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी (दि.३) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ग्रामीण भागातील रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.
..................
वाहतूक सुरळीत करण्याची मागणी
वाशिम : शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका आणि पुसदकडे जाणाऱ्या मार्गावर वाहने तासन्तास खोळंबत असून, अनेकवेळा रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याची मागणी अविनाश मुळे यांनी बुधवारी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली.
...................
समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण
जऊळका रेल्वे : परिसरातील काही गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ग्रामस्थांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी दिली.