वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. या दोन दिवसांत रुग्णालयात जातोय, मेडिकलला जातोय, अशी तीच ती कारणे देऊन वाहनचालक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. गत दोन दिवसांत ४५० जणांना दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद ठेवण्यात आली, तर शनिवार व रविवार असा दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला. अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केलेले असतानाही, अनेकजण घराबाहेर पडले. वाशिम शहरासह रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव येथे विनाकारण घराबाहेर पडणाºया वाहनचालकांना पोलिसांनी अडविले. यावेळी साहेब, रुग्णालयात जातोय, मेडिकलला जातोय, अशी तीच ती कारणे वाहनचालकांनी सांगितली. अनेकजण चुकीची कारणे सांगत असल्याचे लक्षात आल्याने जवळपास ४५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
०००
बॉक्स
शनिवारी २७६ जणांवर कारवाई
शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. शनिवारी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित बाजारपेठ बंद होती. दरम्यान, अत्यावश्यक काम नसतानाही अनेकजण घराबाहेर पडले. वाशिम शहरात स्थानिक पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद नाका येथे विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात २७६ जणांवर कारवाई झाली.
०००
रविवारी १७४ जणांवर कारवाई
वीकेंड लॉकडाऊनच्या शेवटच्यादिवशी अर्थात रविवारीदेखील दिवसभर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाशिम शहरासह रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मालेगाव येथे विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्या जवळपास १७४ जणांवर दंडात्मक कारवाई केली.
०००
बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच
घराबाहेर पडताना सर्वांनीच नातेवाईक रुग्णालयात आहेत, त्यांना भेटण्यासाठी व औषधे घेऊन जात आहे, रुग्णालयात जात आहे, मेडिकलमध्ये जात आहे, अशी तीच ती कारणे सांगितली. या कारणांची खात्री पोलिसांनी केली. जे खरोखरच मेडिकल किंवा रुग्णालयात जात होते, त्यांना सोडून देण्यात आले, तर ज्यांनी चुकीचे कारण सांगितले त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.
००००