महावितरणने आवळल्या वीजचोरट्यांच्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:12 AM2021-03-10T11:12:56+5:302021-03-10T11:13:03+5:30
MSEDCL News जिल्ह्यात आठवडाभरातच दहा लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून, संबंधितांना लाखो रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विविध प्रकारे वीजचोरी करून महावितरणला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या वीजचोरट्यांविरोधात महावितरणकडून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात आठवडाभरातच दहा लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून, संबंधितांना लाखो रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वीजचोरीचा प्रकार सुरू असल्याने महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महावितरणचा स्वतंत्र विभाग या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यरत असला तरी, अपेक्षित प्रमाणात वीजचोरीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. त्यामुळेच महावितरणकडून आता प्रत्येक वीज उपकेंद्रांतर्गत होणारी वीजचोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
महावितरणचे पथक गावागावात फिरून वीजेचोरीचा शोध घेत आहे. त्यात गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात ५९३ वीजग्राहकांची तपासणी करण्यात आली असून, त्यात २१० ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे आढळून आले असून, वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणच्या पथकाने संबंधिताना जवळपास दहा लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
१६९ वीजजोडण्या खंडित
वीजचोरीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाभरातील ५९३ वीजजोडण्यांची तपासणी केली असता त्यात २१० ठिकाणी वीजचोरीचा प्रकार होत असल्याचे आढळून आले. त्यापैकी १६९ ग्राहकांची वीजजोडणी महावितरणच्या पथकाने खंडित केली.
सेक्शन इंचार्जला महिन्यात २०० चोऱ्या पकडण्याचे उद्दिष्ट
वीजचोरीवर आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३२ सेक्शन इंचार्जना (कनिष्ठ अभियंता) महिन्याकाठी २०० चोऱ्या पकडण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सेक्शन इंचार्ज त्यांच्या पथकासह गावागावात भेट देऊन जोडण्यांची तपासणी करीत आहेत.
जिल्ह्यात वीजचोरीचा प्रकार वाढला आहे. यामुळे महावितरणचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याने वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यात वीज जोडण्यांची तपासणी करून दोषी आढळलेल्या ग्राहकांवर वीज अधिनियमानुसार कारवाई केली जात आहे.
-आर.जी. तायडे,
कार्यकारी अभियंता, वाशिम