लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - यावर्षी विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येते. एकिकडे मजूरीत वाढ तर दुसरीकडे उत्पादन व बाजारभावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकºयांचे बजेट कोलमडले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस समाधानकारक झाला नाही. मृग नक्षत्रात पाऊस गायब झाल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी तर काही शेतकºयांना विलंबाने पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसात सातत्य नव्हते. सोयाबीनला शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाला. त्यानंतर ऐन सोयाबीन सोंगणी व काढणीच्या दरम्यान परतीचा पाऊस झाला. त्यामुळे काही शेतकºयांची धावपळ झाली. परतीच्या पावसामुळे सोयाबीनला हानी पोहोचली. तूरीच्या शेतात दोन ओळींमध्ये पेरलेल्या तसेच दुबार पेरणी व विलंबाने पेरणी झालेल्या सोयाबीनची आता काही शेतकरी सोंगणी व काढणी करीत असल्याचे दिसून येते. या सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येत आहे. सुपिक जमिनीत तीन ते सहा क्विंटलदरम्यान तर हलक्या दर्जाच्या जमिनीत दोन ते तीन क्विंटल दरम्यान एकरी उत्पादन होत आहे. दुसरीकडे सोंगणी, काढणीच्या मजूरी खर्चात वाढ झाली आहे. पेरणी ते काढणीपर्यंत एका एकरात सरासरी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो, असे पार्डी टकमोर येथील शेतकरी हरिष चौधरी यांनी सांगितले. त्या तुलनेत आता उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने परिसरातील अनेक शेतकºयांचा लागवड खर्चही वसूल होणार नाही, अशी स्थिती आहे. सोयाबीनला किमान सहा हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी हरिष चौधरी यांनी केली.