शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी उद्यापासून विशेष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:19 PM2021-02-27T16:19:08+5:302021-02-27T16:19:14+5:30
Washim News जिल्ह्यात १ ते १० मार्च या दरम्यान शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.
वाशिम : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ ते १० मार्च या दरम्यान शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास यासह अन्य शासकीय विभागातील अधिकाºयांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदणी व्हावी, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजूरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यासह कुटुंबे स्थलांतरण करीत असल्याने ६ ते १४ वयोगटातील अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. अशा स्थलांतरीत, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. १०० टक्के बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करून कृती करणे शालेय शिक्षण विभागाला अपेक्षीत आहे. शाळाबाह्य, स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या बालकांची शोध मोहिम राबविण्याकामी महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार व आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील अधिकाºयांचे सहकार्य घेतले जाणार आहे. ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये जात नाहीत अशा बालकांचादेखील शोध घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर, तालुकास्तरावर नोडल अधिकाºयांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या.