राज्यात चिमुकले गंभीर आजारांच्या विळख्यात !
By admin | Published: May 31, 2014 12:49 AM2014-05-31T00:49:18+5:302014-05-31T00:50:07+5:30
शालेय आरोग्य तपासणी मोहिमेतून समोर आलेली माहिती
संतोष वानखडे / वाशिम
बदलत्या जीवनशैलीने विविध आजार व त्यासंबंधीचे वयोगट, याबाबतचे अंदाज व संकेत पूर्णत: बदलून टाकले असल्याची माहिती शालेय आरोग्य तपासणी मोहिमेतून समोर आली आहे. मेंदुविकार, हृदयरोग, कर्करोगासारख्या गंभीर आजारांना सहा ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना पछाडले असून, त्यापैकी काहींवर मोठय़ा शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व सर्व शिक्षा मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील पहिली ते दहावी आणि शहरी भागातील पहिली ते चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय आरोग्य तपासणी मोहीम २00८-0९ पासून राज्यभरात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांमधील गंभीर आजार शोधून त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. मनोविकार, मेंदुविकार, रक्तक्षय, रक्ताभिसरण, हृदयरोग, कर्करोग, नेत्ररोग, कर्णरोग, श्वासोछ्वास, त्वचारोग, अस्थिरोग, पचनक्रिया, दंतक्षय आदी गंभीर आजार विद्यार्थ्यांना आपल्या विळख्यात घेत असल्याचे या मोहिमेतून समोर आले आहे. २00८ ते १३ या सहा वर्षांमध्ये सात हजार ९१ विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया तर २८ हजार ६११ विद्यार्थ्यांवर मोठय़ा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २0१३ मधील आजारासंबंधीच्या निश्चित आकड्यांची गोळाबेरीज समोर येण्यास अजून वेळ आहे. ही तपासणी केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी असल्याने, शाळाबाह्य मुलांची अवस्था काय असेल, हे स्पष्ट झालेले नाही. गंभीर आजाराला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहता वैद्यकीय क्षेत्र आणि पालकवर्गासाठी हा चिंतेचा विषय आहे. पाल्याचा आहार, पोषणयुक्त अन्न, नियमित आरोग्य तपासणी आदी गरजा या मोहिमेने अधोरेखित केल्या आहेत.