वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ९ मेपासून लागू केलेल्या कडक निर्बंधांना दुसऱ्यांदा २७ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजीपाला, किराणा, पिठाची गिरणी, रेशन दुकाने, डेअरी, कृषी सेवा केंद्र, बाजार समित्यांचा अपवादवगळता उर्वरित अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार असून, त्यांना पार्सल सुविधा पुरविता येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला सात दिवसांच्या कालावधीसासाठी ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले. १५ मे रोजी पाच दिवसांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा पुन्हा २७ मे पर्यंत कडक निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहणार आहे. मात्र, या कालावधीत किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजीपाला व फळेविक्री, डेअरी, पिठाची गिरणी, रेशन दुकाने, शेतीशी निगडीत अवजारे व उपकरणांची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहेत. भाजीपाला दुकाने व फळे विक्रेत्यांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकेंद्रित स्वरुपात ठिकाणे निश्चित करून द्यावीत व याठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. याव्यतिरिक्त सर्व दुकाने तसेच खाद्य पदार्थांची सर्व दुकाने (मांस, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबंधित नगर परिषद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागात संबंधित गटविकास अधिकारी यांच्या स्तरावरून करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
०००००००००००००
बॉक्स
हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा सुरू राहणार !
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. दूध संकलन केंद्र व घरपोच दूध वितरणास सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा राहील.
००००००००००००
०००००००००००
बॉक्स
सलून, ब्युटीपार्लर पूर्णत: बंद !
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही.
००००००
बॉक्स
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल मिळणार!
सर्व पेट्रोलपंपांवर या आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबींकरिताच पेट्रोल, डिझेल मिळणार आहे. याव्यतिरिक्त महसूल विभाग, डॉक्टर्स, विद्युत विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, नगरपालिका विभाग, पोलीस कर्मचारी, बँक व पोस्ट कर्मचारी, कोषागार कार्यालय, माल वाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. तसेच पत्रकार, दूध वितरक, शेतीशी निगडीत ट्रॅक्टर, मेडिकलधारक, भाजीपाला व फळ विक्रेते, किराणा दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन केंद्र चालक, कृषी व गॅस एजन्सीधारक यांना घरपोच सेवेची मुभा देण्यात आली.
०००००००
बॉक्स
मंगल कार्यालये बंदच राहणार !
सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्नाला केवळ १५ व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी असेल व लग्न सोहळा २ तासांत आटोपणे बंधनकारक आहे. बेकायदेशीररित्या लग्न सोहळा पार पडणार नाही, याची संबंधित ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीला दक्षता घ्यावी लागणार आहे.
००००००००
बॉक्स
सेतू केंद्र व दस्त नोंदणी बंद
सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ इन-सिटू कामकाज सुरु राहील.
००००
शासकीय कार्यालये बंदच!
केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, नगरपालिका तसेच अत्यावश्यक सेवेअंतर्गत महावितरण, कोषागार, पाणी पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, उपप्रादेशिक परिवहन इत्यादी शासकीय कार्यालये सुरु राहणार आहेत. इतर शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. या कार्यालयांना आपले कामकाज ऑनलाईन सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
०००००००