कारंजा लाड: पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच आज कौशल्याचे वेगळे महत्त्व आहे. याच कौशल्याला व्यावसायिक जोड मिळाल्यास त्याची बातच न्यारी, असाच काहीसा उपक्रम सध्या येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. आपल्यातील हस्तकलेच्या कौशल्याच्या जोरावर हे विद्यार्थी टाकाऊ वस्तूंपासून वेस्ट ते बेस्ट कलाकृती साकारत आहेत.ही संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांची आहे. यातूनच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची जोड देत स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगाराची प्रेरणा निर्माण झाली असून, त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढू लागल आहे. हा उपक्रम राबविताना विद्यार्थी महाविद्यालयासोबतच परिसरातील टाकाऊ वस्तूंचा पुरेपूर उपयोग करत त्यापासून सुंदर व देखण्या वस्तूंची निर्माण करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे महाविद्यालयाच्या कार्यालयातील छपाई झालेल्या टाकाऊ कागदापासून सुबक लिफाफ्यांची निर्मिती या विद्यार्थ्यांनी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्याला व्यावसायिकतेची जोड दिली. शिवाय, महाविद्यालय परिसरात वाळलेल्या झाडाच्या बुंध्याचे मूळ अन् त्याच्या लाकडाला आकर्षक आकार देऊन त्यावर मनमोहक रंगरंगोटी केली. ही सुंदर कलाकृती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे, तर जुन्या कालदर्शिका टाकून न देता, त्यावरील निसर्गचित्रांना आकर्षक फ्रेममध्ये बसविण्याचेही कार्य विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. भिंतीवरील हे आकर्षक पोस्टरही अनेकांसाठी लक्षवेधी ठरत आहे. सोबत रंगबिरंगी कागदातून मनमोहक फुलांचा गुच्छ बनविण्याचे कार्य महाविद्यालयातील विद्यार्थी करीत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी हे काम नियमित शिकवणी वर्ग झाल्यानंतर महाविद्यालयामध्ये अधिक वेळ थांबून काम करत आहेत. विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच कौशल्य शिक्षण अन् स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. शिवाय, या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या देहबोलीतून हे प्रकर्षाने निदर्शनासही येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापकांसोबतच शिक्षकेतर कर्मचारीही पुढाकार घेऊन मदत करत आहेत.अभ्यासगटांसाठी लक्षवेधीमहाविद्यालयात वर्षभरात अनेकदा अभ्यास गटांमार्फत भेट देण्यात येते. या अभ्यास गटांना महाविद्यालयाचे एक वैशिष्ट्य म्हणून विद्यार्थ्यांच्या वेस्ट ते बेस्ट कलाकृतींचे दर्शन घडविले जाते.कुलगुरूंनीही केली प्रशंसाधाबेकर महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या वेस्ट ते बेस्ट या उपक्रमाची दखल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी घेतली असून, मुक्तकंठाने प्रशंसाही केली आहे.