दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:28 PM2020-05-13T17:28:46+5:302020-05-13T17:28:55+5:30
दृष्टीदोष आढळून येणाºया विद्यार्थ्यांना आरोग्य विभागातर्फे मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.
- संतोष वानखडे
वाशिम : राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दृष्टीदोष आढळून येणाºया विद्यार्थ्यांना आरोग्य विभागातर्फे मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सहा ते १८ वयोगटातील सर्व शालेय मुलांची वर्षातून एका आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये जन्मत: व्यंग, आजार, जीवनसत्वांची कमतरता व अपंगत्व याचे निदान व उपचार केले जातात. आरोग्य तपासणीसाठी जवळपास ११९५ वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली आहेत. राज्यात शासकीय व निमशासकीय मिळूण एकूण ८१ हजार ५५६ शाळा असून, त्यामध्ये शिकणाºया मुलांची संख्या १ कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ आहे. गत दोन वर्षातील तपासणीदरम्यान साधारणत: ८ टक्के मुलांमध्ये दृष्टिदोष आढळून आले. विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण अधिक असल्याने वाचन, लिखाण व अभ्यास आदी शैक्षणिक बाबींवर याचा विपरित परिणाम होत असल्याने, दृष्टिदोष आढळून येणाºया गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रापासून आरोग्य विभागातर्फे मोफत चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांनी सांगितले.