मालेगाव तालुक्यात तरुण शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:54 PM2018-12-15T17:54:49+5:302018-12-15T17:55:17+5:30
वजीरखेडे येथील घटना : कर्जाला कंटाळून घेतला निर्णय
मालेगाव : दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन तालुक्यातील वजीरखेडे येथील नीलेश धर्मराज ह्याळीज (२९) या तरुण शेतक-याने शनिवारी (दि.१५) पहाटे विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. नीलेशच्या नावावर सुमारे पाच लाख रुपये कर्ज आहे.
तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा तर खरीप व रब्बी पिकेही हातची गेली आहेत.नीलेश ह्याळीज यांच्या नावावर स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे ४ लाख व इतर १ लाख असे एकूण ५ लाख रुपये कर्ज आहे. शेतीतील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन नीलेश याने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश हा ह्याळीज कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. नीलेश हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई चित्रकला तसेच ऋषाली, प्रणाली, तृप्तीमाला, सपना या चार बहिणी आहेत. या घटनेची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ह्याळीज कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. तर तहसिल कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात आली असून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाणार आहे.