सिंचन विहिरींच्या प्रक्रियेला स्थगिती देऊन दोषीवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:10+5:302021-06-16T04:53:10+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यातील व्याड ग्रामपंचायतकडून २०२१-२२ या वर्षातील सिंचन विहिरीच्या कृती आराखड्यात यापूर्वी रोहयोअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्याचे नाव ...
वाशिम : रिसोड तालुक्यातील व्याड ग्रामपंचायतकडून २०२१-२२ या वर्षातील सिंचन विहिरीच्या कृती आराखड्यात यापूर्वी रोहयोअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्याचे नाव घेण्यात आले, तसेच ग्रामपंचायत हद्दीत शेती नसलेल्या शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ही सिंचन विहिरींची प्रक्रिया तत्काळ रद्द करून संबंधित दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप रामकिसन बोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्रा.पं. सदस्य बोडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी सिंचन विहिरींचा लाभ घेतलेला आहे, अशा लाभार्थ्यांच्या एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींची नावे कृती आराखड्यात घेण्यात आली असून, पात्र गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रकरणी त्वरित चौकशी करून, सिंचन विहीर प्रक्रियेस स्थगिती द्यावी, तसेच दोषींवर कारवाई करून गरजू व पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा नाइलाजास्तव गरजू लाभार्थ्यांसोबत आपणास उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही बोंडे यांनी निवेदनातून दिला आहे.