बीएसएनएलच्या सेवेत तांत्रिक बिघाड
By admin | Published: June 15, 2014 01:11 AM2014-06-15T01:11:10+5:302014-06-15T01:13:59+5:30
तब्बल १८ तास भ्रमणध्वनी, दूरध्वनी आणि ब्रॉडबँड सेवा खंडित झाली होती.
कारंजालाड : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या सेवेत तांत्रिक बिघाड आल्याने तालुक्यातील तब्बल १८ तास भ्रमणध्वनी, दूरध्वनी आणि ब्रॉडबँड सेवा खंडित झाली होती. परिणामी बँकिंग व्यवहार ठप्प पडल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या वतीने कारंजा ते मूर्तिजापूर मार्गावर भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. यामधील मूर्तिजापूरपासून ११ कि.मी.पर्यंतच्या केबलमध्ये बिघाड आल्याने शुक्रवारी रात्री १0.१५ वाजतापासून या कंपनीची सेवा बंद पडली. परिणामी भ्रमणध्वनीधारक, दूरध्वनी आणि ब्राँडबँड सेवाधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लँडलाईनची सेवा विस्कळीत झाल्याने तालुक्यातील २१00 ग्राहक आणि भ्रमणध्वनीच्या हजारो ग्राहकांचा जगाशी संपर्क तुटला होता. तसेच सातत्याने इंटरनेटद्वारे जगाशी कनेक्टेड राहणार्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तालुक्यात ४७0 ब्राँडबँडधारक आहेत. येथील राष्ट्रीयीकृत व मल्टिस्टेट बँकेने कोअर बँकिंग प्रणाली अवलंबविल्याने ब्राँडबँड सुविधा अत्यावश्यक झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ब्राँडबँड सेवा प्रभावित झाल्याने बँकेचे व्यवहार ठप्प पडले. १४ जून रोजी शनिवार असल्याने बँकिंग व्यवहार अध्र्या दिवसापर्यंतच सुरू होते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत ग्राहकांनी गर्दी केली होती. पण बीएसएनएलची सेवा खंडित झाल्याने ग्राहकांना बाहेरगावी पैसे पाठविता आले नाही. परिणामी ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उद्या रविवार सुटीचा दिवस आल्याने ग्राहकांची कामे थेट सोमवारवर ढकलल्या गेली आहे.