तहसिलदार, नायब तहसिलदार सामूहिक रजेवर; कामकाज प्रभावित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:44 PM2021-02-02T17:44:42+5:302021-02-02T17:44:49+5:30
Washim News तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे २ फेब्रुवारी रोजी सामुहिक रजेवर गेले.
वाशिम : उमरखेड (जि. यवतमाळ) येथील नायब तहसीलदारांवर हल्ला करणाºया रेती माफियाविरूद्ध अद्याप कारवाई झाली नाही. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यात तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे २ फेब्रुवारी रोजी सामुहिक रजेवर गेले. या आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याचे मंगळवारी दिसून आले.
उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोशे हे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गेले असता, रेती माफियाने पवार यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणातील आरोपीविरूद्ध अद्याप ठोस कारवाई झाली नाही तसेच तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेच्या मागण्यांची दखलही घेण्यात आली नाही. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. २ फेब्रुवारी रोजी तहसिलदार, नायब तहसिलदारांनी सामुहिक रजा आंदोलन केल्याने आणि या आंदोलनास वाशिम जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिल्याने मंगळवारी प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.