वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होत असलेल्या प्रदूषणाने वृद्ध आणि आजारी लोकांना सर्वाधिक त्रास होतो. गेल्या काही वर्षांमध्ये ही समस्या डोकेदुखी ठरली आहे. वाहने जुनी झाल्यानंतर त्यातून अधिक प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी झालेली वाहने भंगारात काढण्याच्या पॉलिसीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास वाशिम जिल्ह्यातील खासगी व व्यावसायिक ५०० पेक्षा अधिक वाहने भंगारात निघणार आहेत. यामुळे मात्र वेळोवेळी दुरुस्ती करून तथा प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी सर्व निकषांचे पालन करणाऱ्या जुन्या वाहनांचे मालक संभ्रमात सापडले आहेत.
..................
बॉक्स :
आतापर्यंत काय होता नियम?
वाहनांच्या बाबतीत ठरवून दिलेल्या नियमानुसार पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांसाठी १५ वर्षे आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी १० वर्षांपर्यंतची मुदत निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यानंतर सदर वाहने रस्त्यावर चालविण्याची परवानगी दिली जात नाही. असे असताना १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेली वाहने रस्त्यांवरून धावत आहेत.
...............
कोट :
केंद्रीय अर्थसंकल्पात ‘स्क्रॅप पॉलिसी’ लागू करण्याचा निर्णय झालेला आहे; मात्र यासंबंधी अद्यापपर्यंत कुठलेही अधिकृत निर्देश प्राप्त झालेले नाहीत. राज्य शासनाकडून अशा काही सूचना मिळाल्यास त्याची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर हिरडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम