बसस्थानकात व्हील चेअरच नाही; दिव्यांग, ज्येष्ठांची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:16+5:302021-01-25T04:41:16+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या बसस्थानकांमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘व्हील चेअर’ आणि इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या बसस्थानकांमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘व्हील चेअर’ आणि इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दिव्यांगांना बसस्थानकात सहज प्रवेश करता यावा, यासाठी प्रामुख्याने जिल्हा मुख्यालय बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात उताराची आणि त्याच्याकडेने रेलिंगची व्यवस्था उभी व्हायला हवी. याशिवाय प्रसाधनगृहात अशा व्यक्तींकरिता शौचालयांमध्ये किमान कमोड असायला हवे. बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी ‘व्हील चेअर’ उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, यातील एकही सुविधा जिल्हा मुख्यालयी, बसस्थानकामध्ये उपलब्ध नसल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले.
.........................
बसस्थानकातून दररोज ये-जा करणाऱ्या बसेसची संख्या - २०६
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या -१०००
................
बॉक्स :
‘व्हील चेअर’ अद्याप मिळाल्याच नाहीत
वाशिम आगाराला अद्यापपर्यंत वरिष्ठ पातळीवरून ‘व्हील चेअर’ मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ही व्यवस्था याठिकाणी उपलब्ध झाली नाही; तर बसस्थानकात ये-जा करण्याच्या ठिकाणी व स्वच्छतागृहांच्या पायऱ्यांवर रॅम्प उभारण्याकडे आगाराने लक्ष पुरविले नाही.
.........................
कोट :
वाशिमचे आगार हे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने किमान याठिकाणी तरी सर्व सुविधा मिळायला हव्यात. मात्र, पायऱ्या चढउतार करतानाच्या ठिकाणी साधी रॅम्पची व्यवस्थाही नाही. आमच्यासारख्या ८० वर्षांच्या म्हाताऱ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
- नारायण हरी जाधव
ज्येष्ठ नागरिक
....................
दिव्यांगांसाठी बसस्थानकात ‘व्हील चेअर’ असते हे मला माहीतच नाही. एस. टी.ची प्रतीक्षा करत बराच वेळ ताटकळत बसावे लागते. लघुशंका किंवा शौचास जायचे असल्यास त्रास होतो. असे असताना बसस्थानकात दिव्यांगांच्या या समस्यांबाबत कोणी साधी विचारपूसही करत नाही.
- रमेश कुल्हे, दिव्यांग
...................
वाशिम आगाराने ‘व्हील चेअर’ची मागणी यापूर्वीच केलेली आहे. मात्र, ती वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहे. बसस्थानकाच्या प्रवेशव्दारानजीक रॅम्प नाही. स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या ठिकाणी ही व्यवस्था गतवर्षीच उभारण्यात आलेली आहे. ‘व्हील चेअर’ मिळण्यासंबंधी पाठपुरावा केला जाईल.
- विनोद इलामे
आगारप्रमुख, वाशिम आगार