चोरट्यांची नजर मंदिरांवर, देविदेवता कुलूपबंद; दानपेट्यांसह अन्य साहित्य लंपास करण्याचा सपाटा
By सुनील काकडे | Published: September 21, 2022 06:21 PM2022-09-21T18:21:50+5:302022-09-21T18:23:00+5:30
किन्हीराजा येथे पुरातन काळातील शेकडो वर्षे जुने हेमाडपंथी पद्धतीने माता कमलेश्वरीचे मंदिर वसलेले आहे.
वाशिम- सृष्टीचा निर्माण करणारे, भक्तांच्या हाकेला धावून येणारे, सर्वांचे रक्षण करणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविदेवतांची मंदिरे चोरट्यांनी ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. दानपेट्यांसह मंदिरातील इतर साहित्य लंपास करण्याचा जणू सपाटाच लागला असून या भितीपायी मंदिरे दिवसाही कुलूपबंद राहत असल्याचे किन्हीराजा (ता.मालेगाव) येथे दिसून येत आहे.
किन्हीराजा येथे पुरातन काळातील शेकडो वर्षे जुने हेमाडपंथी पद्धतीने माता कमलेश्वरीचे मंदिर वसलेले आहे. याशिवाय खंडोबारायांचे मंदिर, शिव मंदिर, समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते स्थापित हनुमानाचे मंदिर. विश्वनाथ महादेव मंदिर, खोलेश्वर महादेव मंदिर आहे. नव्याने बांधण्यात आलेले संतसखू माता मंदिर, माता नवदुर्गा मंदिरानेही गावाची शोभा वाढली आहे.
कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे सुमारे दोन वर्षे ही सर्व मंदिरे कडेकोट बंद होती. वर्षभरापासून मात्र निर्बंध हटल्याने मंदिरे खुली झाली. त्यायोगे दर्शनासाठी भाविकांची रिघ लागायला लागली असतानाच मंदिरातील देवांच्या मुर्ती, दानपेट्यांसह इतर साहित्यांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. गावातील अनेक मंदिरातील देवांच्या मुर्ती, समई, नंदादिप, घंटे, साकळी, दिवे, दानपेट्या भर दिवसा चोरीला गेल्याच्या अनेक घटना गत काही दिवसांत समोर आल्या आहेत.
भक्तांमध्ये भितीचे वातावरण
गत महिनाभरात किन्हीराजातील कमेलेश्वरी संस्थान, संत सखूमाता संस्थान व माता नवदुर्गा संस्थान, हनुमान मंदिर, विश्वनाथ महादेव मंदिर, केशवराया मंदिर या सर्व ठिकाणच्या दानपेट्या फोडून त्यातील हजारो रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. यामुळे पंचक्रोशितील भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.