लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळून आल्याने तीन विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीच्या वार्षिक परीक्षेसाठी जिल्ह्यात नियमित १९२०३ आणि रिपिटर ८२६ असे एकूण २० हजार २९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. १८ फेब्रुवारीपासून एकूण ६५ केंद्रांवर परीक्षेला सुरूवात झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असल्याने शिक्षण व महसूल विभागाच्या भरारी पथकाने दिलेल्या भेटीत तीन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. शिरपूर ता. मालेगाव, धावंडा व विठोली येथील परीक्षा केंद्राला भरारी पथकाने भेटी दिल्या. या परीक्षा केंद्रावर प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण तीन विद्यार्थ्यांजवळ कॉपी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा व तालुका मिळून एकूण १२ भरारी पथके जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केली. याव्यतिरिक्त सहा गटशिक्षणाधिकाऱ्यांवर परीरक्षकाची जबाबदारी सोपविली आहे. २० फेब्रुवारी रोजी मराठी विषयाला पेपर होणार असून, विद्यार्थ्यांनी गैरप्रकाराला थारा देऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी केले. (प्रतिनिधी)
बारावी परीक्षेत कॉपी केल्याने तीन विद्यार्थी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:09 PM