देगाव शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:48 PM2021-02-27T12:48:19+5:302021-02-27T12:48:39+5:30
Washim News रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून दिवसातून तीन वेळा आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेला भेट देवून आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील २२९ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक शाळेत तैनात केले होते. त्याचबरोबर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोग्य विभागाने तातडीने या सूचनांची अंमलबजावणी करून या शाळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या शाळेचे तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. येथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा शाळेला भेट दिली. तसेच सद्य:स्थिती जाणून घेतली.
व्हिडिओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद
बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्हा प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जात आहे.