शिरपुर जैन पोलिस स्टेशनमधील लाचखोर पोलिस जमादारास तीन वर्षाचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:24 PM2018-02-28T16:24:06+5:302018-02-28T16:24:06+5:30
वाशिम - लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या शिरपुर जैन पोलिस स्टेशनमधील मधुकर विठ्ठलराव अवगळे या दोषी आढळुन आलेल्या पोलीस जमादारास तीन वर्षाचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के.गौर यांनी बुधवार २८ फेब्रुवारी रोजी सुनावली.
शिरपुर जैन पोलिस स्टेशन येथे दाखल एका प्रकरणात चौकशीसाठी ठाण्यात बोलावुन पोलिस कारवाई थांबविण्यासाठी ५ हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार नारायण हरिभाऊ घुडे रा.नंदाना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर संबंधीत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी एल.एम.वडजे यांनी ६ एप्रिल २०१० रोजी सापळा रचुन आरोपी मधुकर अवगळे यास २ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले होते. तक्रारदार नारायण घुडे यांनी आपल्या शेतात हद्द लावण्यासाठी एक ट्रॉली दगड शेताच्या कोपºयावर रस्त्याच्या बाजुला आणुन टाकले होते. शेताशेजारील शेतकरी शामराव भिवाजी बोरकर यांनी दगड टाकुन शेतात येण्याजाण्याचा रस्ता का बंद केला अस दम भरुन घुडे यांच्यासोबत बाचाबाची व शिविगाळ करुन शिरपूर जैन पोलिस स्टेशनला घुडे यांच्याविरुध्द फिर्याद दिली होती.सदर प्रकरणी बिट जमादार अवगळे यांनी घुडे यांना पोलिस ठाण्यात बोलावुन कारवाई थांबवायची असेल तर ५ हजार रुपयाची मागणी केली यावरुन १५०० व १ हजार असे अडीच हजार रुपये दिल्यानंतर सुध्दा तेवढयात भागणार नाही आणखी २ हजार रुपये द्यावेच लागणार असे म्हटल्यावरुन घुडे यांनी आरोपीविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार अर्ज दिला होता.सदर प्रकरणी लाचलुचपत विभागाने सापळा रचुन आरोपी अवगळे यास लाचेची २ हजार रुपयाची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाच्या सुनावणीनंतर दोषी आढळुन आल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश गौर यांनी आरोपी मधुकर अवगळ यास कलम ७ मध्ये तीन महीने सश्रम कारावास व १०हजार रुपयाची दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास व कलम १३ (१) ड सह कलम १२ (२) प्रमाणे तीन वर्ष सश्रम कारावास १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. सदर दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावायाचे आदेश न्यायालयाने आपल्या आदेशात नमुद केले आहे. या प्रकरणी तक्रारदार तर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड.एस.के.गिमेकर यांनी काम पाहिले.