कडक निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:47+5:302021-05-19T04:42:47+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेले कडक निर्बंध शिथिल करून ठराविक कालावधीसाठी संपूर्ण बाजारपेठ ...

Traders aggressive in demanding relaxation of strict restrictions! | कडक निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमक !

कडक निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमक !

Next

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेले कडक निर्बंध शिथिल करून ठराविक कालावधीसाठी संपूर्ण बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत युवा व्यापारी मंडळाने १८ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. विविध मागण्यांचे निवेदन सादर करीत प्रशासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मार्चपासून व्यापारी सतत लॉकडाऊनचे अनेक टप्पे ओलांडून सुद्धा आपला व आपल्या कर्मचारी वर्गाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मागील वर्षीच्या पहिल्या कोरोना लाटेत वाशिमच्या व्यापाऱ्यांनी प्रशासनास संपूर्ण प्रतिसाद देत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकामी योगदान दिले, असे व्यापारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या निदर्शनात आणून दिले. दुसऱ्या लाटेत बाजारपेठ बंद राहत असल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थितीही फार कोलमडत आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने सर्वच व्यापाऱ्यांकरिता मोठे हंगामाचे महिने आहेत. वार्षिक उलाढालीच्या जवळपास ३० ते ४० टक्के उलाढाल ही या दोन महिन्यांच्या कालावधीत होत असते. मागील वर्षीच्या लॉकडाऊन व सद्य परिस्थितीत लावलेल्या कडक निर्बंधांमुळे व्यापारी समुदाय व कामगारांसमोर विविध अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याच्या अटीवर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी युवा व्यापारी मंडळाने केली आहे.

०००

बॉक्स

अशा आहेत प्रमुख मागण्या

संपूर्ण बाजारपेठ दररोज ठराविक कालावधीसाठी सुरू करण्यास परवानगी द्यावी.

किमान एका वर्षासाठी स्थानिक प्रशासनाने व्यावसाईक घरपट्टी, भाडे व ___ पाणीपट्टी माफ करावे.

पालिका व्यवसाय परवाना शुल्क पूर्ण माफ करावे.

मार्च, एप्रिल व मे २०२१ या तिन्ही महिन्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे.

ज्या व्यापारी बांधवाच्या घरातील कर्ती व्यक्ती कोरोनामुळे मयत झाली; तिच्या परिवाराला विशेष मदत व सुविधा मिळवून द्याव्यात.

सर्व बँक आणि वित्तीय संस्थांनी या वर्षाचे व्याज माफ करावे व अल्पदरात कर्ज वितरण करावे.

या आर्थिक वर्षार्तील जी.एस.टी. कर भरण्यास केंद्राकडून मुबलक वेळ मिळवून द्यावा व सर्व दंडात्मक कारवाई रद्द करून द्यावी.

००००

बॉक्स

कापड व्यावसायिकांनीही दिले निवेदन

उन्हाळा हा लग्नसराईसाठी चांगला हंगाम असून, या दरम्यान कापड बाजाराला झळाळी मिळत असते. गेल्यावर्षीदेखील ऐन उन्हाळ्यात संपूर्ण लॉकडाऊन होते. त्यामुळे कापड व्यावसायिकांना जबर फटका बसला. या उन्हाळ्यातदेखील कडक निर्बंध असल्याने कापड बाजार बंदच आहे. त्यामुळे कापड व्यावसायिक आणि कामगार यांच्यावर आर्थिक संकट कोसळत आहे. या सर्व बाबींचा विचार करून काही ठराविक कालावधीसाठी कापड बाजार सुरू करण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी कापड व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १८ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

००००

Web Title: Traders aggressive in demanding relaxation of strict restrictions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.