वाहनामध्ये कोंबून जनावरांची वाहतूक; जनावरांच्या वाहतूक नियमांना वाहनचालकांचा खो
By नंदकिशोर नारे | Published: September 14, 2022 04:31 PM2022-09-14T16:31:22+5:302022-09-14T16:32:18+5:30
जनावरांची वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी. वाहतुकीमध्ये काळजी न घेतल्याने जनावरे आजारी पडण्याची आणि दगावण्याची शक्यता असते.
वाशिम - वाशिम शहरातून ट्रक, चारचाकी वाहनांमधून जनावरांची अवैध वाहतूक होत असून एका पेक्षा जास्त जनावरे वाहनात कोंबल्या जात असल्याने जनावरांना इजा पोहचत आहेत. याकडे मात्र संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
जनावरांची वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी. वाहतुकीमध्ये काळजी न घेतल्याने जनावरे आजारी पडण्याची आणि दगावण्याची शक्यता असते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून जनावरांची तपासणी करून घ्यावी. आजारी जनावरांना वेगळे करून त्यावर उपचार करावेत. आजारी जनावरांची वाहतूक टाळावी परंतु याकडे संबधितांकडून साफ दुर्लक्ष केल्या जात आहे. वाशिम शहरातून मंगळवारी भरदुपारी भरचौकातून जनावराची वाहतूक करण्यात आली. यावेळी चौकात असलेल्या पोलिसांनाही हा प्रकार दिसून आला परंतु कोणीही याबाबत कोणतीच दखल घेतली नाही. रस्त्यावरील खड्डयांमुळे एकमेकांना जनावरे धडक असल्याने त्यांना जखमाही होत असल्याचे दिसून आले.
जनावरांसाठी वाहतुकीचा नियम
भारत सरकारच्या अध्यादेशानुसार जनावरांशी अमानुष वागणूक प्रतिबंध कायदा १९६० मधील घटक ३८ उपघटक १ मध्ये जनावरांच्या वाहतुकीचे नियम २००८ दुरुस्तीचा समावेश केलेला आहे. ही दुरुस्ती पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकारच्या जनावरांच्या वाहतुकीचे नियम १९७८ या अध्यादेशात करण्यात आली आहे. या अध्यादेशानुसार नियमांचे पालन केल्यास जनावरांना त्रास कमी होतो. जनावरांची शारीरिक स्थिती खालावत नाही. नियमांचे उल्लघन केल्यास, ज्यामुळे जनावरांना शारीरिक व मानसिक हानी होत असेल, तर तो पशुपालक शिक्षेस पात्र ठरू शकतो.