जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा हे चार आगार असून मानोरा आणि मालेगाव हे उपआगार कार्यान्वित आहेत. याअंतर्गत एकूण १६७ एस.टी. बस असून सध्या जिल्हांतर्गत व परजिल्ह्यात प्रवासाकरिता एकूण ३२ बस सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गातून काहीअंशी दिलासा मिळाल्यानंतर २५ मे पासून एस.टी.च्या प्रवासी वाहतुकीस सुरुवात करण्यात आली. वाशिम आगारांतर्गत आधी रिसोड, अकोला आणि नंतर अमरावती मार्गावर सर्वाधिक बस सोडण्यात येत आहेत. इतर आगारांमधून बुलडाणा, जालना, कारंजा, पुसद, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये बस सोडण्यात येत आहे. प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे व सोबत सॅनिटायझर बाळगणे आवश्यक करण्यात आले आहे. तशा सूचना चालक, वाहकांकडून प्रवाशांना दिल्या जात आहेत. प्रवाशांकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळण्याचा प्रश्न सध्यातरी उपस्थित झाला नसल्याचे दिसून येत आहे.
.................
जिल्ह्यातील एकूण बस - १६७
सध्या सुरू असलेल्या बस - ३२
एकूण कर्मचारी - ८७०
सध्या कामावर वाहक - ४०
सध्या कामावर चालक - ४०
वाहक - ३६४
चालक - २९५
........................
एसटीची सर्वाधिक वाहतूक अकोला मार्गावर
१) एसटीसाठी अनलाॅक झाल्यानंतर २५ मे पासून ४० च्या क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.
२) एसटीची सर्वाधिक वाहतूक पूर्वीप्रमाणेच अकोला मार्गावर होत असून त्यापाठोपाठ अमरावती आणि नांदेड या मार्गावर एसटीच्या फेऱ्या केल्या जात आहेत.
३) एसटी सुरू झाली असली तरी प्रवाशांकडून मात्र अद्यापपर्यंत विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने उत्पन्नात घट येत आहे.
................
सॅनिटायझर वापराकडे दुर्लक्ष
एसटीमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडून तोंडाला मास्क लावण्यात येत आहे; मात्र सॅनिटायझर सोबत बाळगणारे, त्याचा वापर करणारे बोटावर मोजण्याइतकेच असल्याचे दिसून येत आहे.
...............
दहा लाखांपेक्षा अधिक तोटा
कोरोनामुळे चालूवर्षीही अनेक दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहिली. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. २५ मे पासून तिढा सुटला; मात्र प्रवासीच मिळत नसल्याने गेल्या ८ ते १० दिवसांत दहा लाखांपेक्षा अधिक तोटा झाला.
................
नागरिक घरातच...
एसटीची प्रवासी वाहतूक सुरू झाली असली तरी त्यास विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. अधिकांश नागरिक घरातच असून अनेकजण खासगी वाहनांनी प्रवास करणे पसंद करीत आहेत.
...................
बस सुरू झाली अन् जीवात जीव आला
कामानिमित्त आठवड्यातून दोन ते तीन दिवस वाशिम-अकोला प्रवास करावा लागतो; मात्र मध्यंतरी एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने गैरसोय झाली. २५ मे पासून एसटी पुन्हा सुरू झाल्याने सोयीचे झाले आहे.
- संदिप चिखलकर
.............
पॅसेंजर रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे एसटीचाच आधार होता; मात्र कोरोनामुळे ही वाहतूकही मध्यंतरी बंद राहिली. आता पुन्हा एसटी सुरू झाल्याने प्रवासाकरिता ठोस पर्याय उपलब्ध झाला आहे.
- सूरज बैरवार