लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : नागपूर-औरंगाबाद दृतगती मार्गावरील नागी गावावाजवळ रायपूरवरून मेहकरकडे लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रक उलटून मोठा अपघात झाला. त्यात चालक आणि क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले. सदर घटना शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संपर्क साधूनही १०८ रुग्णवाहिका येण्यास बराच विलंब लागल्याने तोपर्यंत जखमींना ताटकळत राहावे लागले.प्राप्त माहितीनुसार, नागपूर-औरंगाबाद दृतगती मार्गावर रायपूर येथून मेहकरकडे लोखंडी अँगल घेवून जाणारा सी.जी. ०४ जे.सी. ७१४५ या क्रमांकाच्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात चालक आणि क्लिनर हे दोघेही ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकून पडले होते. या मार्गावरुन धावणाºया इतर वाहनांच्या चालकांनी सलग अर्धा तास मोठी कसरत करून दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. जखमी अवस्थेतील चालक व क्लिनरला शेलूबाजार ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेव्दारे प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भगत यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ‘रेफर’ केले. घटना घडल्यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधूनही रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकली नाही. १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेबाबत यापूर्वीही अनेकवेळा तक्रारी झाल्या; मात्र रुग्णवाहिकेवर तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती नसल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. परिणामी, भविष्यात या समस्येमुळे मोठा अनर्थ घडणार असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर-औरंगाबाद मार्गावर ट्रकचा अपघात; चालक, क्लिनर गंभीर जखमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 6:00 PM