वाशिम जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका अमरावती बोर्डाकडे रवाना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 04:01 PM2020-05-13T16:01:39+5:302020-05-13T16:01:39+5:30
बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : इयत्ता बारावीची परीक्षा होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्ह्यातील एकाही केंद्रावरील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अमरावती बोर्डाकडे पाठविणे शक्य झाले नव्हते. दरम्यान, सद्या मिळालेल्या शिथिलतेमुळे बुधवार, १३ मे रोजी जिल्ह्यातील बारावीच्या उत्तरपत्रिका ट्रकव्दारे अमरावती बोर्डाकडे रवाना करण्यात आल्या. यावेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होण्यापूर्वीच सुदैवाने बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या; मात्र त्यानंतर २५ मार्चपासून देशभरासह संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्येही संचारबंदी आणि लॉकडाऊन लावण्यात आला. सार्वजनिक वाहतूकीवरही बंदी लादण्यात आली. परिणामी, जिल्ह्यातील केंद्रांवर पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तशाच अडकून पडल्या होत्या. आता लॉकडाऊन व संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता मिळाल्याने अमरावती बोर्डाचे प्रतिनिधी महादेवराव मेहरे व त्यांच्या सहकार्यांनी वाशिमच्या श्री शिवाजी विद्यालयात येऊन तीन विशेष वाहनांव्दारे बारावीच्या सर्व उत्तरपत्रिका सील करून अमरावती बोर्डाकडे रवाना केल्या. यावेळी चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. तथापि, उत्तरपत्रिका बोर्डाकडे तपासणीसाठी गेल्याने बारावीचा निकाल देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.