वाशिम : वाशिम जिल्ातील मालेगाव तालुक्यामधील करवदरी येथे गावाजवळ असलेल्या पाझर तलावावर धुणे धुण्याकरिता गेलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १४ जून रोजी सकाळी घडली.कवरदरी येथील विद्या शालिग्राम पडघान (वय १३) व निकिता उकंडा कांबळे (वय १२) या आज सकाळी गावानजीक असलेल्या पाझर तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. विद्याचा पाय अचानकपणे घसरुन ती तलावात पडली. यावेळी निकिताने तिला हात देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तीही तलावात पडली व दोघीही तलावात बुडाल्या. शशीकलाबाई पांडुरंग तायडे या महिलेने या घटनेची माहिती पडघान व कांबळे यांच्या घरी जाऊन सांगितली. तेव्हा अनेकजण धावत तलावावर आले. त्यानंतर दोघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत चिंतामण राजाराम पडघान यांनी जऊळकारेल्वे पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक विद्या सातव्या वर्गात तर निकिता ही सहाव्या वर्गात उत्तीर्ण झाली होती.या दोघींच्या आकस्मिक मृत्यूच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाझर तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू
By admin | Published: June 14, 2014 10:43 PM