आणखी दोन जणांचा मृत्यू; ६५६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:36 AM2021-05-15T11:36:30+5:302021-05-15T11:36:38+5:30
Corona cases in Akola : आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर तब्बल ६५६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवार, १४ मे रोजी आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर तब्बल ६५६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३४६८५ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कडक निर्बंधाच्या कालावधीतदेखील कोरोनाचा आलेख चढताच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे वाशिम तालुक्यात आढळून आले आहेत.
गत तीन दिवसात इतर तालुक्याच्या तुलनेत वाशिम तालुक्यात कमी रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी वाशिम तालुक्यात १७३ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये शहरी भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. वाशिम शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम असल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे. जिल्ह्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी घेण्यात आली.
एकूण ६५६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १७३, मालेगाव तालुक्यातील १२७, रिसोड तालुक्यातील १०२, मंगरूळपीर तालुक्यातील ५१, कारंजा तालुक्यातील ६६ आणि मानोरा तालुक्यात ९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याबाहेरील ४३ बाधिताची नोंद झाली असून ४४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.