विनापरवाना बांधकाम होणार अधिकृत; रिसोड नगर परिषदतर्फे विशेष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:00 PM2018-01-11T17:00:03+5:302018-01-11T17:01:56+5:30
रिसोड : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद हद्दीमधील अनधिकृत व विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी नगर परिषदतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
रिसोड : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद हद्दीमधील अनधिकृत व विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी नगर परिषदतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी गुरूवारी केले.
नगर परिषदेची परवानगी घेतल्यानंतर घर किंवा व्यापारी संकुलांचे बांधकाम करता येते. रिसोड शहरात अनेकांनी कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेतला बांधकामे केली आहेत. यापूर्वी विनापरवाना बांधकामप्रकरणी संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई प्रस्तावित होती. आता शासनस्तरावरूनच शासनाच्या निकषानुसार पात्र ठरलेली विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. परवानगी घेतली असेल, पण नियमानुसार बांधकाम केले नसेल तर त्यासाठीदेखील बांधकामे नियमित केली जाणार आहे. रिसोड नगर परिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नगर परिषदेकडे अर्ज करता येणार आहेत. अनधिकृत, विनापरवान केलेली बांधकामे अधिकृत होणार असली तरी त्यासाठी शासनाची नियमावली आहे. शासनाच्या निकषानुसार संबंधित बांधकाम अधिकृत होत असेल तरच आवश्यक दंड व शुल्काचा भरणा केल्यानंतर सदर बांधकाम अधिकृत केले जाणार आहे. जागा किंवा घरासंदर्भात मालकी हक्काचा वाद किंवा दावा नसलेला असावा. निर्धारित पेक्षा किती बांधकाम जास्त झाले त्याचाही विचार या मोहिमेदरम्यान केला जाणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रमाणपत्र व अन्य बाबींची प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहणी केली जाणार आहे. कागदपत्रे सादर करून बांधकाम अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी केले.