वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून ‘अनलॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 11:58 AM2021-06-06T11:58:48+5:302021-06-06T11:59:02+5:30
'Unlock' in Washim district from tomorrow : शासन नियमानुसार अनलॉकचे सुधारित नियम उद्या, सोमवारपासून लागू होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार राज्य शासनाने उद्या, सोमवारपासून राज्यात पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश असून, शासन नियमानुसार अनलॉकचे सुधारित नियम उद्या, सोमवारपासून लागू होणार आहेत.
दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. गत सहा दिवसांपासून तर दोन अंकी संख्येत कोरोना रुग्ण येत असून, कोविड केअर सेंटरही ओस पडत असल्याचे आशादायी चित्र आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने १ जूनपासून जिल्ह्यात निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात उद्या, सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार आहे, अशी घोषणा गुरुवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर राज्य शासनातर्फे करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार हे स्तर ठरविण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २.१ टक्के, तर आठ टक्के रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात असून, शासन नियमानुसार अनलॉकच्या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.
काय सुरू राहील ?
अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील.
हॉटेल्स, सलून, पार्लर ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील.
सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू राहतील.
खासगी आणि सरकारी कार्यालयांत ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील.
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला ५० टक्के क्षमतेने (सभागृहाच्या) दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी राहील.
काय बंद राहील?
इन डोअर खेळामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहणार आहेत. दुपारी दोन वाजल्यानंतर हॉटेल्स बंद राहणार असून, त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील. शनिवारी आणि रविवारी हॉटेलही बंद राहतील
खासगी शिकवणी वर्गातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने खासगी शिकवणी वर्गही बंदच ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अनलॉकच्या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- शण्मुगराजन एस.,
जिल्हाधिकारी, वाशिम