उंबर्डा बाजार येथे लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:16+5:302021-07-16T04:28:16+5:30

पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ येथे पाळीव जनावरांवरील फऱ्या व घटसर्प आजारावर नियंत्रण व्हावे म्हणून लसीकरण मोहीम राबविली जात ...

Vaccination begins at Umbarda Bazaar | उंबर्डा बाजार येथे लसीकरणास सुरुवात

उंबर्डा बाजार येथे लसीकरणास सुरुवात

Next

पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ येथे पाळीव जनावरांवरील फऱ्या व घटसर्प आजारावर नियंत्रण व्हावे म्हणून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. उंबर्डा बाजार येथे जनावरांच्या लसीकरणास सुरुवात झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुण इंगळे यांनी दिली.

पावसाळ्याच्या दिवसात जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उपचार करण्यापेक्षा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिक काळजी घेणे हितकारक ठरते. वातावरणातील ओलावा, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण, गोठ्यातील ओलावा, चारा पाण्याची ढासळलेली प्रत या एकूणच परिस्थितीमुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो. जनावरांवरील आजाराचा प्रतिबंधक करण्यासाठी दरवर्षी सुरुवातीला जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे.

उंबर्डा बाजार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ अंतर्गत १७ गावे येत असून, ५६८५ जनावरांची नोंद आहे. लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुण इंगळे यांच्यासह पट्टीबंधक गुलाबराव लोमटे, विनोद राऊत परिश्रम घेत आहेत.

०००

ही आहेत फऱ्या आजाराची लक्षणे

जनावराला एकाकी ताप येणे, मागचा पाय लंगडणे, मांसल भागाला सूज येणे, सूज दाबल्यास चरचर आवाज येणे ही लक्षणे आहेत. तसेच घटसर्प या आजारात जनावर एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते. अंगात ताप भरतो. गळ्याला सूज येऊन डोळे खोल जातात. घशाची घरघर सुरू होते. जनावरांना अशी लक्षणे दिसून येताच पशुवैद्यकीय डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुण इंगळे यांनी केले.

Web Title: Vaccination begins at Umbarda Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.