लसीअभावी वाशिम जिल्ह्यातील ११७ केंद्रांतील लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:57 AM2021-04-11T11:57:33+5:302021-04-11T11:57:44+5:30
Corona Vaccination : १२७ पैकी ११७ केंद्रांतील लसीकरण ठप्प झाले तर उर्वरीत १० केंद्रांत शनिवारी दिवसभर लस देण्यात आली.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. मात्र, सद्यस्थितीत लसीचा प्रचंड तुटवडा असून, १२७ पैकी ११७ केंद्रांतील लसीकरण ठप्प झाले तर उर्वरीत १० केंद्रांत शनिवारी दिवसभर लस देण्यात आली.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात कोरोनाचा आलेख खाली आला होता. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंताही वाढली. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. दरम्यान, केंद्राकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा झाला नसल्याने गत दोन, चार दिवसांपासून राज्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. वाशिम जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह खासगी हॉस्पिटल अशा १२७ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे.
१ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांना लस दिली जात आहे. दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यातही लसीचा तुटवडा असून, शनिवार, १० एप्रिलपर्यंत केवळ १८०० डोस शिल्लक होते. त्यामुळे
लसीअभावी ११७ केंद्रांतील लसीकरण तुर्तास बंद पडले असून, १० केंद्रांत लस देण्यात आली. शनिवारी दिवसभर पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याने आणि वरिष्ठांकडून तातडीने लसीचा पुरवठा झाला नाही तर रविवारी या १० केंद्रांतील लसीकरणही प्रभावित होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वरिष्ठांकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. अद्याप लसीचा पुरवठा झाला नाही. लसीचा पुरवठा केव्हा होणाऱ्याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
दुसरा डोस लांबणीवर !
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा लागतो; मात्र सध्या लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. १५ एप्रिलदरम्यान लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. लसीचा आवश्यक साठा उपलब्ध होत नाही ; तोपर्यंत पहिला डोज घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस मिळणार नाही. लसीचा पुरवठा कधी होणार, याकडे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन हजाराच्या आसपास डोस शिल्लक आहे. लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे. लवकरच लसीचा साठा उपलब्ध होईल.
-डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम