वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:32 PM2019-11-26T14:32:21+5:302019-11-26T14:32:35+5:30
इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती, अर्ज भरुन घेण्याचे काम विविध पक्षांच्यावतिने सुरु झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडीस सुरुवात झाली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालिंना वेग आला असून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती, अर्ज भरुन घेण्याचे काम विविध पक्षांच्यावतिने सुरु झाले आहे. पक्ष कार्यालयांना यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी ७ जानेवारी २०२० चा मुहूर्त ठरविल्याबरोब या मुहूर्ताची वाट पाहत बसलेल्या राजकारण्यांनी हालचाली वाढविल्यात. वाशिम जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी मुंबईत केली. त्यानुसार जिल्हयात १९ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.
वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५२ गट तर ६ पंचायत समिती मिळून १०४ गणाचा समावेश आहे. यामध्ये जिल्हापरिषदेच्या ५२ गटामध्ये गतवेळच्या संख्याबळानुसार सर्वाधिक सदस्य संख्या काँग्रेस पक्षाची आहे. त्या खालोखाल राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ८ सदस्य आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे ६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ४, भारिप-बमसंचे ३ तर ६ सदस्य अपक्ष होते. पुन्हा निवडणुकीत उतरण्यासाठी विद्यमान सदस्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली असून नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. वाशिम येथील भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात यानुषंगाने गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.शिवसेना कार्यालयावर इच्छुकांची गर्दी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम येथील जनशिक्षण संस्थान येथे असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयात २५ नोव्हेंबर रोजी मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. यावेळी खा. भावना गवळी यांनी इच्छूक उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तसेच यावेळी काही नागरिकांनी शिवसेनेमध्ये पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसकडून इच्छुकांकडून घेतले अर्ज
काँग्रेस पक्षाच्यावतिने जिल्हा परिषद निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर रविवारपासून पक्षनिधीसह अर्ज स्विकारण्यात येत असून ३० नोव्हेंबरपर्यंत रविवारपर्यंत हे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर अर्ज केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती प्रदेश काँग्रेस कमेटीच्यावतिने नियुक्त करण्यात आलेल्या निरिक्षकांच्या उपस्थितीत घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांनी दिली. सद्यस्थितीत काँग्रेस कमेटी कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे.
विविध पक्षांच्या सभांना वेग
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांच्या सभा, कॉर्नर बैठकी होवून त्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होत आहेत. तसेच या निवडणुकीबाबत धोरण आखल्या जात आहे. वाशिम जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्यकारिणीची तालुका व शहर अध्यक्ष व आघाडी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण सभा २६ नोव्हेंबर मंगळवार रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आली.या महत्वपूर्ण सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे निरीक्षक तुकाराम रेंगे पाटील, प्रफुल गुडघे पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक, आमदार अमित झनक, प्रकाशराव साबळे, जिल्हा प्रभारी किसनराव गवळी, सुरेश इंगळे, युसुफ पुंजाणी, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेकरिता जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी सर्व तालुका व शहर अध्यक्ष ,महिला काँग्रेस युवक काँग्रेस, सेवादल,एन.एस.यु.आय, तसेच जिल्हा अल्पसंख्यांक विभाग, अनु. जाती विभाग, ओबीसी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.