दर एकादशीला महिलांकडून ग्रामसफाईचे ‘व्रत’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:43 PM2019-11-26T14:43:56+5:302019-11-26T14:44:30+5:30

आपला गाव नेहमीच स्वच्छ राहावा म्हणून येथील महिला दर एकादशीला ग्रामसफाईचा उपक्रम राबवित आहेत.

Village cleaning campaing by women in Washim District | दर एकादशीला महिलांकडून ग्रामसफाईचे ‘व्रत’!

दर एकादशीला महिलांकडून ग्रामसफाईचे ‘व्रत’!

Next

- बबन देशमुख 
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: देशभरात स्वच्छता अभियानासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असतानाही स्वच्छतेबाबत बहुतेक ठिकाणी जनता गंभीर नाही. तथापि, मानोरा तालुक्यातील भुली हे गाव याला अपवाद ठरत असून, आपला गाव नेहमीच स्वच्छ राहावा म्हणून येथील महिला दर एकादशीला ग्रामसफाईचा उपक्रम राबवित आहेत. त्यांचा हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे.
राज्य आणि केंद्र शासनाने संपूर्ण देशात गेल्या पाच वर्षांपूर्वी स्वच्छता अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हे अभियान राबविण्यात येत असताना अनेक वेळा दिशानिर्देश देण्यासाठी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयही घेतले. त्यामुळे बराच फरक पडला असला तरी, ग्राम स्वच्छतेबाबत जनता फारशी गंभीर नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मानोरा तालुक्यातील भुली हे गाव मात्र, याला अपवाद ठरत आहे. या गावातील महिला दर एकादशीला अर्थात दर पंधरा दिवसांनी संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवितात. गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरापासून या कार्याला सुरुवात केली जाते.
त्यानंतर या महिला गावातील रस्ते चौक स्वत: हाती झाडू घेऊन साफ करतात आणि गोळा झालेला कचरा पुन्हा पसरून घाण होऊ नये म्हणून गावाबाहेर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावतात. या आदर्श उपक्रमासाठी ताईबाई दोनतकर, गयाबाई पिगांने, वनिता खरोडे, यमुना अंबुरे, नर्मदा इहरे, जिजाबाई खोडके, गंगाबाई पिंगाने, निर्मला शिंदे, लता गावंडे, चंद्रसैना शिंदे, बयनाबाई मोहिते, इंदू भगत, लक्ष्मी तायडे, सुलाबाई वारे, सुमित्रा वारे, कौसलबाई गवई, प्रभा सोनुलकर, सुमन तायडे, लक्ष्मी तायडे, इंदू गेडाम, सुशिला चव्हाण, सुरेखा कवटकर व गजानन गावंडे आदि महिला सहभागी होत आहेत.

महिला पोलीस पाटलांचे प्रोत्साहन
आपल्या गावात स्वच्छता राहावी आणि जनतेचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून महिला मंडळीने पाच वर्षांपासून गावात दर पंधराव्या दिवशी एकादशीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय स्त्युत्य आणि गावासाठी हितकारी असल्याने गावच्या महिला पोलीस पाटील छाया अरूण डहाके यांनी आपल्या पदाचा विचार करून या महिलांच्या निर्णयाला बळ देण्यासाठी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे, तर त्या स्वत: हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सक्रीय होऊन सर्व महिलांना प्रोत्साहित करीत आहेत.

Web Title: Village cleaning campaing by women in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.