गावतलाव फुटला; शेकडो एकर शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:05 PM2020-09-11T16:05:52+5:302020-09-11T16:06:19+5:30
शेकडो एकर शेतीत पाणी घुसून पिके वाहून गेली, तर अनेक शेतकºयांची शेतजमीनही खरडून गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यात १० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कवठळ येथील सूस्थितीत असलेला गाव तलाव फुटला. यामुळे शेकडो एकर शेतीत पाणी घुसून पिके वाहून गेली, तर अनेक शेतकºयांची शेतजमीनही खरडून गेली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणे, तलाव आॅगस्ट महिन्यातच काठोकाठ भरले असून, १५ पैकी १० पेक्षा अधिक प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात गुरुवारी रात्री मंगरुळपीर तालुक्यात अतिवृष्टी झाली; पावसाचे प्रमाण एवढे होते की , तालुक्यातील कवठळ येथील गावतलावाची भींतच फुटून शेकडो एकर शेतीत पाणी घुसल्याने पिके वाहून गेली. अनेक शेतकºयांची शेतजमीनच पाण्यामुळे खरडून गेली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले असून, शासनाने या नुकसानापोटी त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
शेतकºयांच्या २५ शेळ्या वाहून गेल्या.
कवठळ येथील गाव तलाव फुटल्याने शेतीपिकांचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झालेच शिवाय शेतातीत गोठ्यात बांधलेली गुरेही वाहून गेल्याची प्राथमिक माहिती शेतकºयांच्या चर्चेतून मिळाली आहे. त्यात या गावातील काही शेतकºयांच्या मिळून २५ शेळ्या वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. या नुकसानाची पडताळणी प्रशासनाकडून करण्यात येत असून, पाहणीनंतरच पशूहानीचे निश्चित नुकसान कळू शकणार आहे.
वाहून गेलेला एक शेतकरी सुदैवाने वाचला.
कवठळ येथील गावतलाव अतिवृष्टीमुळे फुटल्याने नाल्यास पूर आला. या पुरात कवठळ येथील शेतकरी गणेश पांडुरंग पोहाने वाहून गेले. सुदैवाने पुढे नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाच्या फांद्यांना पकडणे शक्य झाल्याने परिसरातील काही शेतकºयांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचल्याची माहितीही मिळाली आहे.