वाशिम: येत्या २५ जानेवारी रोजी साजरा होणाºया मतदार दिनाच्या औचित्यावर जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने मतदार जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी फलक प्रदर्शनासह सांस्कृतिक आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. वाशिम जिल्ह्यातही या विशेष दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या १७ जानेवारीपासून प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी मतदान करणे का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषत: १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याशिवाय मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नव मतदारांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.