वाशिम : तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, कर्करोगसारखे इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरीरावर होणाºया दुष्परिणामांची माहिती लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आजार व इतर दुष्परिणाम याविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. याकरिता विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच महत्वाच्या ठिकाणी याबाबतचे माहिती फलक लावून जनजागृती करावी. त्याचबरोबर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. १ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यात ३० वर्षांवरील नागरिकांची मुख कर्करोग तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोहिमेदरम्यान तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणाम विषयक जनजागृती करण्याबरोबरच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडण्याबाबतही लोकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दीपक सेलोकर यांनी ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाईल, असे सांगितले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाच्या डॉ. मंजुषा वºहाडे यांनी माहितीचे सादरीकरण केले. मानवी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर कसा विपरित परिणाम होत आहे, याची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केल्या.