वाशिम जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 05:54 PM2019-08-05T17:54:32+5:302019-08-05T17:55:12+5:30
वाशिम: जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत साडेतीन हजारांवर शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन अद्यापही अदा झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत साडेतीन हजारांवर शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन अद्यापही अदा झालेले नाही. जि.प. स्तरावर वार्षिक वेतनवाढ जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिक्षकांचे वेतन प्रलंबित असून, यामुळे शिक्षकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदे अंतर्गत ७७९ शाळा असून, या शाळांवर साडे तीन हजारांवर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन अदा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रयत्नही करण्यात येतात; परंतु बरेचदा शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला होत नाही. त्यामुळे शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात बँक, पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते प्रलंबित राहतात. घरच्या आर्थिक अडचणी उद्भवतात. जुलै आॅगस्ट महिन्यातही अशीच स्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. आॅगस्ट महिन्याची पाच तारिख उलटली तरी, शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता शासनाने जुलै महिन्याचे वेतन आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आॅनलाईन पद्धतीने वेतन करण्याची तयारी करून सर्व प्रक्रियाही पूर्ण केली; परंतु केवळ दोन महिन्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने करणे योग्य ठरणार नसल्याने शासनाकडून पुन्हा शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाला पुन्हा आॅफलाईन पद्धतीने वेतन करण्याची तयारी करावी लागली. यामुळे वेतनाची देयके तयार करण्यास विलंब झाला आणि शिक्षकांचे वेतन रखडले, असे कळले.
पंचायत समित्यांची वेतन देयके तयार
महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे कडक निर्देश असल्याने तालुकास्तरावर पंचायत समित्यांनी आपापल्या परिने तयारी करून शिक्षकांच्या वेतनाची देयके तयारही केली आणि शिक्षकांच्या वेतनासाठी निधीची मागणीही नोंदविली; परंतु वरिष्ठस्तरावर प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने कोषागाराकडे वेतनाची देयकेच पोहोचू शकली नाहीत. त्यातच जुलै महिन्यात वेतनवाढ जोडावी लागत असल्यानेही अंतिम देयके सादर करण्यास विलंब झाला. त्याचा फटका मात्र शिक्षकांना बसला आहे.
शासनाने जुलै महिन्याचे वेतन आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याची तयारी केली असतानाच जुलै महिन्याचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नव्याने आॅफलाईन देयकाची तयारी करावी लागली. यामुळेच शिक्षकांचे वेतन वेळेवर करता आले नाही.
-अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम