वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकदिवशी लेखणी बंद आंदोलन करीत धरणे दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात सुधारित मसुदा पारित करावा, गत दोन ते तीन महिन्यांपासून मानधन देण्यात आले नसल्याने सदर मानधन तातडीने देण्यात यावे, दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियमित मानधन देण्यात यावे, ‘पीटीओ’ दर्जाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन जर कुशन निधीतून होत असेल तर याबाबत वेगळा निधी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा त्यांचे मानधनदेखील प्रशासकीय निधीतूनच करण्यात यावे, सन २०१७ मधील आठ टक्के मानधन वाढ देण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना देय असलेली रजा मंजूर करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वाशिमच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. लेखणी बंद व धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला. दरम्यान, या आंदोलनस्थळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी भेट देत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. यासंदर्भात महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीनेदेखील वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.