वाशिम : परिचारिकांना संरक्षक किटच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:34 AM2020-04-10T11:34:01+5:302020-04-10T11:34:06+5:30
कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांना शासनाकडून संरक्षण किट अद्याप मिळाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार आणि देखभालीसाठी विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांना शासनाकडून संरक्षण किट अद्याप मिळाली नाही. परिचारिकांनादेखील पीपीटी किट व अन्य संरक्षण सुविधा देण्याची मागणी हुमानिवा नॅचरोपॅथी, योगा, आायुर्वेद, मेडीकल आणि पॅरामेडीकल परिषद व्दारा संचालित नर्सेस असोसिएशन आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ९ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांसह सार्वजनिक आरोग्य विभागच्या प्रधान सचिवांकडे केली.
नर्सेस असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. माया रमेश वाठोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होत असून, राज्यात दिवसेंदिवस पिडीत रुग्णांची भर पडत आहे. या कोरोनापिडीत रुग्णाांवर उपचार आणि देखभालीसाठी डॉक्टर्ससह हजारो नर्सेस (परिचारिका) आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने परिचारीका संघटनेमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रोत्साहनपर भत्ताही नाही
कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या परिचारिकांना शासनाने प्रोत्साहनपर भत्ता देणे गरजेचे आहे. प्रोत्साहनपर भत्ता मिळाला तर परिचारिकांची आर्थिक गैरसोय दूर होईल, असा आशावाद नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या या काळात डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकादेखील कर्तव्य बजावत आहेत. शासकीय, निमशासकीय किंवा खासगी दवाखान्यांमधील परिचारिकांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
- डॉ. माया वाठोरे, अध्यक्ष, नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य