वाशिम : कृषि, आरोग्य, ग्रामविकास, जलसंधारण विभागाच्या योजनांसह समाज कल्याण विभागाच्या योजनांविषयी ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने चार चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांना आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्यातील ७२ गावांत हे चित्ररथ फिरणार आहेत.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत मुसळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, तानाजी घोलप, राजू जाधव, दिलीप काळे आदी उपस्थित होते. चित्ररथाच्या माध्यमातून कृषि अभियांत्रिकीकरण, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आदी योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ७२ गावांत हा चित्ररथ फिरणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी पवार यांनी यावेळी सांगितले.