वाशिम : मद्यपींच्या दारु खरेदीसाठी लागलेल्या रांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 03:07 PM2020-05-06T15:07:52+5:302020-05-06T15:08:13+5:30
दुकानांवर मद्यपींच्या दारु खरेदीसाठी भव्य रांगा लागलेल्या दिसून आल्यात.
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर २५ मार्चपासून सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’चा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे; मात्र ठराविक वेळेत नियमांचे पालन करून मद्यविक्रीस जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यात देशी दारूच्या दुकानांसह वाईन शॉपी आणि बियर शॉपी ६ मे पासून सुरू करण्यात आल्यात. दुकानांवर मद्यपींच्या दारु खरेदीसाठी भव्य रांगा लागलेल्या दिसून आल्यात. जिल्हयातील काही मद्य व्यावसायिकांनी नियमांचे पालन न केल्याने त्यांची दुकाने उघडण्यावर बंदी केली होती. नियमांचे पालन पूर्ण केल्यानंतर त्यांचीही दुकाने उघडण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ३ मे रोजी मद्यविक्रीच्या दुकानांबाबत एकत्रित मार्गदर्शक तत्व व दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात ६ मे पासून देशी दारूविक्री सकाळी आठ ते दुपारी दोन आणि वाईन शॉपी, बियर शॉपी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार, ४ मे रोजी संबंधित सर्व दुकानदारांना ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ राखण्यासंबंधी चौकोन आखणे, दुकानासमोर लोखंडी कठडे तयार करण्यासह इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे फर्मान सोडण्यात आले. या नियमांचे जयांनी पालन केले ती दारुची दुकाने आज जिल्हयात सुरु झालीत. दुकानासमोरील गर्दी पाहता पोलीसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.