लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ‘श्रीं’च्या मंदिरांवर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध रितीने लाभ घेतला.
वाशिमचे संस्थान भाविकांनी फुललेवाशिम शहरातील जुनी आययूडीपी कॉलनीस्थित संत गजानन महाराज संस्थानवर ‘श्रीं’च्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांची ७ फेब्रुवारीला महाप्रसादाने सांगता झाली. यादिवशी सकाळी १२ वाजतापासून रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत खिचडी आणि बुंडीच्या लाडूंचे भाविकांना वितरण करण्यात आले. शिस्तीचा प्रत्यय देत भाविकांनीही अत्यंत शांततेत महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यासाठी संस्थानच्या सेवेकर्यांसह इतर भाविकांनी पुढाकार घेतला.
कवठळ येथे प्रकटदिन उत्साहात साजरामंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथे संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’चा प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ७ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता गजानन महाराज मुर्तीची महापुजा कवठळ येथील नरेश देशमुख, अंजली देशमुख यांच्याहस्ते करण्यात आली. तसेच घुंगरु महाराज यांच्याही मुर्तीचे पुजन झाले. पुरुषोत्तम सखाराम महिंद्रे यांनी साडेपाच किलो वजनाचे पंचधातुचे मुकूट संस्थानला अर्पण केले. हा सोपस्कार पार पडल्यानंतर कवठळ नगरीत ‘श्रीं’च्या पादुकांची मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ८ वाजता हभप संदिप महाराज घुगे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कवठळ, बोरव्हा, गिंभा, जामदरा, कोठारी, येथील भाविकांनी पुढाकार घेतला.
कामरगावातील भक्तांमध्येही उत्साहयेथील गजानन महाराज संस्थानवरही प्रकटदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये भाविकांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. ७ फेब्रुवारीला आयोजित महाप्रसादालाही हजारो भाविकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. यादिवशी गजानन महाराजांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पालखीत सहभागी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. गण गण गणांत बोते च्या गजराने कामरगाव नगरी यावेळी दुमदुमली. मिरवणुकीची सांगता गजानन महाराज मंदिरात झाली. त्यानंतर लगेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
‘श्रीं’च्या जयघोषाने दुमदुमले पोहा गाव!श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त येथे ७ फेब्रुवारी रोजी श्रीमद् भागवत कथा समाप्ती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा परिसरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३0 वाजता गावातून ‘श्रीं’ची पालखी मिरवणुक काढण्यात आली. त्यात ‘श्रीं’चा जयघोष करण्यात आला. यावेळी प्रत्येक घरासमोर पालखीचे पुजन करण्यात आले. चौकाचौकात भाविकांसाठी चहा-पाणी व फराळाचे वितरण करण्यात आले. दुपारी १ वाजता हभप प्रमोद महाराज राहणे, रा.अटाळी यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी ३ वाजता महाप्रसादाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज भक्त मंडळ व गावकर्यांनी अथक परिश्रम घेतले.
अनसिंग : प्रकटदिन महोत्सवाची सांगता!दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथील संत गजानन महाराज संस्थानवर प्रकटदिन महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम साजरे झाले. शेवटच्या दिवशी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. संस्थानमध्ये गेल्या सात दिवसापासून हभप शिवाजी महाराज ठाकरे यांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन झाले. याशिवाय दैनंदिन हभप भिमराव महाराज, संतोष महाराज, विशाल महाराज खोले, रामेश्वर महाराज गुंड, बाबुराव महाराज तडसे, हभप पद्माकर महाराज देशमुख यांचे किर्तन झाले. शेवटच्या दिवशी नरेश महाराज, आळंदी यांनी काल्याचे किर्तन सादर करून समाज प्रबोधन केले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण झाले. यावेळी सापळी, सोंडा, उमरा, वारा, जवळा, पिंपळगाव, वारला, शेलू येथील भजनी मंडळी उपस्थित होती. यानिमित्त गावातील व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून महाप्रसादाच्या कार्यक्रमात योगदान दिले.