लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात झाल्याने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले आहेत. आता १४ जूनपासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी असून, जिल्हा पूर्णत: अनलॉक होणार आहे. दरम्यान, सर्वच निर्बंध हटले असले तरी नागरिकांनी गाफील न राहता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.२०२० मध्ये पहिल्या लाटेत एप्रिल ते ३ जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच होती. त्यानंतर अनलॉकचे टप्पे सुरू झाल्याने बाजारपेठही हळूहळू सावरत गेली. व्यवसायाला उभारी मिळण्याच्या काळातच कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा बाजारपेठ प्रभावित झाली. दुसऱ्या लाटेत मार्च ते मे या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात आली. जून महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी खाली आल्याने निर्बंध शिथिल झाले तसेच राज्य शासनाने पाचस्तरीय अनलॉक जाहीर केला. जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ २.२५ टक्के असून, ९.०१ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असल्याने जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात झालेला आहे. त्यामुळे १४ जूनपासून जिल्हा पूर्णत: अनलॉक होणार असून, बाजारपेठेत पुन्हा नवचैतन्य निर्माण होणार आहे. लग्न समारंभात ५० व्यक्ती, अंत्यविधीला २० व्यक्तींना उपस्थित राहण्यास मुभा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ यांना सभागृह, हॉलच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने परवानगी राहणार आहे. मॉल, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने, तर उर्वरित सर्वच उद्योग, धंदे, दुकाने पूर्ण क्षमतेने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने अर्थचक्राला गती मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया उद्योग जगतामधून उमटत आहेत.
कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल बंधनकारक !अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने, सिनेमागृहे, मॉल, रेस्टॉरंट, सभागृह, मंगल कार्यालये, लॉनचे मालक, चालक तसेच येथे काम करणारे कर्मचारी व होम डिलिव्हरी सेवा पुरविणारे सर्व कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे अथवा कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. कोरोना चाचणीचा अहवाल १५ दिवसांसाठी वैध राहील. लसीकरण केले नसल्यास किंवा कोरोना चाचणी अहवाल सोबत नसल्यास पहिल्या वेळेस १०० रुपये दंड व त्यानंतर प्रत्येक वेळेस २०० रुपये दंड आकरण्यात येणार आहे.
या सेवा, दुकाने राहणार सुरू !अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने. ५० टक्के क्षमतेने मॉल, सिनेमागृहे. हॉटेल, रेस्टॉरंट, जीम, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, मंगल कार्यालये, लॉन. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंग.
काय बंद राहणार !पुढील आदेशापर्यंत प्रेक्षकांची गर्दी करून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येणार नाही. शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी, अभ्यासिका.
.... तर ई-पास बंधनकारक !सार्वजनिक वाहतूक, कार्गो वाहतूक, निर्यातक्षम क्षेत्रातील उद्योग नियमित सुरु राहणार आहेत. आंतर जिल्हा प्रवास नियामिपणे सुरु राहील. मात्र, २० टक्केपेक्षा अधिक ‘पॉझिटिव्हीटी रेट’ असलेल्या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात येताना ई-पास बंधनकारक राहणार आहे.
सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत आहे. यापुढेही जिल्हावासियांनी सतर्क राहावे. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध उठविले असले तरी प्रत्येक व्यक्तीने कोरोनाविषयक नियमाचे पालन करून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.- शण्मुगराजन एस.जिल्हाधिकारी, वाशिम.