Washim Unlock : निर्बंध शिथिल; पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:27 AM2021-06-08T11:27:11+5:302021-06-08T11:27:20+5:30
Washim Unlock: पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठेत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून आणखी शिथिल करण्यात आले. वाढीव सवलतींसह नवीन नियमावलीदेखील लागू करण्यात आली. त्यानुसार, ७ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सर्वच प्रकारची दुकाने सुरू करण्यात आली; मात्र पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठेत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. बहुतांश ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पुरता फज्जा उडाला. तथापि, कोरोना संसर्गाने प्रमाण कमी झाले; मात्र संकट अद्याप टळलेले नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने नव्याने पारित केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हाभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी, शिवभोजन थाळी केंद्र, जिम, सलून, ब्यूटिपार्लर, वेलनेस सेंटर यासह पादचारी मार्गावर थाटण्यात आलेली दुकाने सोमवारपासून सुरू करण्यात आली.
दरम्यान, आस्थापना, प्रतिष्ठान चालकांसह नागरिकांनी तोंडाला मास्कचा वापर करण्यासह फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा भारतीय दंडसंहिता १८६० मधील कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला.
त्याउपरही निर्बंध शिथिल केल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांची पूर्णत: मोडतोड करण्यात आल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. ही बाब कोरोना संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
(प्रतिनिधी)